सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
| या पिकास 25 ते 33 अंश सेल्सियस, तापमान व 700 ते 1000 मि.मी. पर्जन्यमानाची गरज आहे. | ![]() |
| मध्यम भारी प्रतिची उत्तम निचरा होणारी, आम्ल - विम्ल निर्देषांक (सामू) 6.5 ते 7.5 पर्यत असलेली जमिन या पिकासाठी योग्य असते. |
| • जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोल नांगरट तीन वर्षातून एकदा करून व दोन ते तीन वखराच्या पाळया देऊन जमीन समपातळीत करावी. • हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरून नंतर व्यवस्थित जमिनीत मिसळण्यासाठी वखराची पाळी द्यावी. • पेरणीपूर्वी एक वखराची पाळी (जांभूळवाही) दिली असता तणांची तीव्रता कमी होते. |
|---|
![]() |
• बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास @ ३ ग्रॅम कार्बोक्सीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डीएस (मिश्र घटक) (व्हिटाव्हॅक्स पॉवर) किंवा पेनफ्लुफेन १३.२८ टक्के ट्रायफ्लोक्सस्ट्रोबिन १३.२८ टक्के (एव्हरगोल) १ मि.ली. किंवा थायोफिनेट मिथाईल पायराक्लोस्ट्रोबीन (झेलोरा) @ २.५ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. • त्यानंतर खोडमाशी व चक्रभुंगा किडीच्या व्यवस्थापनाकरीता थायोमिथोक्साम ३० एफ.एस. @ १० मि.ली. प्रति किलो बियाण्यास लावावे. • त्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धक ब्रेडीरायझोबियम जापोनिकम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रत्येकी १० किलो बियाण्यास चोळावे. • बीज प्रक्रिया करतांना बियाणे जोरात घासू नये तसेच प्रथम बुरशीनाशकाची नंतर किटकनाशकाची त्यानंतर जिवाणू खताची बीज प्रक्रिया करावी. • वर नमूद केलेल्या रासायनिक बुरशीनाशकाची तसेच किटकनाशकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या ४ ते ५ दिवस आधी केली तरी चालेल परंतू जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या २ ते ३ तास आधी करावी व सावलीत वाळवावे. |
| अ. क्र. | वाणाचे नाव | परिपक होण्याचा कालावधी (दिवस) | हे. उत्पादन (क्विंटल) | तेलाचे प्रमाण (टके) | पेरणी करीता हे. बियाणे (किलो) |
| १ | पिहीकेव्ही अंबा (१००-३१) | ९४-९८ | २८-३० | २०-२०.५ | ६० |
| २ | सुवर्ण सोया (एएमएस -एमबी ५-१८) | ९८-१०२ | २४-२८ | १९.५-२० | ६० |
| ३ | PDKV- यलो गोल्ड (एएमएस-१००१) | ९५-१०० | २२-२६ | १९-१९.५ | ६० |
| ४ | PDKV- पूर्वा (एएमएस-२०१४-१ ) | १०२-१०५ | २२-२६ | १८-२० | ६० |
| ५ | जेएस २०-११६ | ९५-१०० | २६-२८ | १७-१८ | ७५ |
| ६ | जेएस २०-९८ | ९६-१०१ | २०-२४ | १९-२० | ७५ |
| ७ | जेएस २०-३४ | ८६-८८ | २०-२२ | २०-२०.५ | १०० |
| ८ | जेएस २०-२९ | ९३-३६ | २०-२४ | २०-२०.५ | ७५ |
| ९ | जेएस ९३-०५ | ९०-९५ | २०-२४ | १८-१९ | ७५ |
| १० | जेएस ३३५ | ९८-१०२ | २२-२४ | १८-१८.५ | ७५ |
| ११ | एमएयुएस ६१२ | ९३-९८ | २४-२७ | १९.५-२० | ६५ |
| १२ | एमएयुएस १५८ | ९३-९८ | २२-२५ | १९-१९.५ | ६५ |
| १) पुरेसा पाऊस (७५ ते १०० मि.मी.) झाल्यानंतर जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. २) पेरणी ट्रॅक्टरद्वारे करावयाची झाल्यास रुंद वरंबा सरी पध्दतीने करावा किंवा पेरणी करतांना पट्टा पध्दत वापरावी पेरणी बैल जोडीने करत असल्यास सरत्यानी करावी, तिफणीचा वापर टाळावा. ३) सोयाबीनचे बियाणे ४ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते. ४) अति लवकर किंवा लवकर येणारे सोयाबीनचे वाण पेरावयाचे असल्यास दोन ओळीतील व रोपट्यामधील अंतर ३० x ८ सें.मी. किंवा ४५ x ५ सें.मी. ठेवावे, मध्यम ते उशिरा येणाऱ्या कालावधीच्या वाणासाठी दोन ओळीतील व रोपट्यामधील अंतर ४५ x १० सें.मी. ठेवावे. ५) उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. |
| • बियाण्याचे प्रमाण ठरवितांना दाण्याचा आकार व वजन पाहून किमान ७० टक्के उगवणशक्तीचे वरील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे बियाणे वापरावे. • स्वतः जवळचे बियाणे वापरायचे असल्यास घरच्या घरी उगवणशक्ती तपासून नंतरच पेरणी करावी. |
| • रासायनिक खतांची संपूर्ण खत मात्रा ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी पेरणी सोबतच द्यावीत (६५ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश). • शक्यतो खत व्यवस्थापन करतांना सरळ खते द्यावी परंतू हे शक्य नसल्यास मिश्र खत देतांना २० किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. • खतांची मात्रा ठरवितांना माती परिक्षणाचा अहवाल विचारात घ्यावा. एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी ५ टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. • बियाण्यास जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी यामुळे रासायनिक खतांची अर्धी बचत होते. तसेच एकिकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास मदत होते. • माती परिक्षणानुसार आवश्यकता भासल्या सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून अथवा जमिनीतून द्यावे. • सोयाबिनचे अधिक उत्पन्न् मिळण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रेसोबत पेरणीनंतर 50 व 70 दिवसांनी २ % (100 लिटर पाण्यात 2 किलो युरिया) युरियाची फवारणी करावी किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत २ टक्के १९:१९:१९ (पाण्यात विरघळणारे खत) नत्रः स्फुरदः पालाश ची फवारणी करावी. खोल काळया जमिनीत सोयाबिन पिकाचे अधिक उत्पादन व पाण्याची कार्यक्षमता आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्याकरिता 1.5 टन जिप्सम प्रति हेक्टरी दोन वर्षातून एक वेळा पेरणीपूर्वी द्यावे. मध्यम खोल काळया गंधक व जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत सोयाबिनची अधिक उत्पादकता आर्थिक मिळकत आणि दाण्यांची प्रत व प्रमुख अन्नद्रव्यांची कार्यक्षमता तसेच जमिनीची सुपिकता सुधारण्याकरिता शिफारसीत खत मात्रे सोबत (30 कि. नत्र: 75 कि. स्फुरद: 30 कि. पालाश) प्रति हेक्टरी 30 कि.ग्रॅ. गंधक व 2.5 कि.ग्रॅ. जस्त माती परिक्षणानुसार पेरणीच्या वेळी द्यावे. जस्ताची कमतरता असलेल्या मध्यम खोल काळया जमिनीत सोयाबीनची अधिक उत्पादकता, आर्थिक मिळकत आणि दाण्यांची प्रत तसेच नत्र व स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जस्त सल्फेट 5 ग्रॅम प्रति ली. किंवा जस्त ईडिटिए 2.5 ग्रॅम प्रति. ली. उगवणी नंतर 30,45, व 60 दिवसांनी फवारणीद्वारे देण्याची शिफारस करण्यात येते. |
| १) सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ ओळी नंतर सरी काढावी. २) सोयाबीन पिकाची पट्टा पध्दतीने (६ ओळ सोयाबीन व त्यानंतर १ ओळ रिकामी) पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून मुलस्थानी जलसंवर्धन करता येईल. (अ.भा.स.स.प्र. अंतर्गत शिफारस). |
| १) मध्यम भारी जमिनीत तूर पिकामध्ये सोयाबीन १:२ किंवा २:४ या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निव्वळ तुरीपेक्षा फायदेशीर आढळून आले आहे. तसेच कपाशी पिकामध्ये लवकर येणारे सोयाबीनचे १:१ किंवा १:२ हे प्रमाण फायदेशीर आहे. २) कोरडवाहू शेती पध्दतीत धान्य, चारा व कडधान्याची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळण्याकरिता सोयाबीन ज्वारी तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पध्दतीत ६:२:१ किंवा ९:२:१ या ओळींच्या प्रमाणात पेरणी करावी. |
| • डवरणीच्या दोन पाळ्या द्याव्यात. पहिली डवरणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसानी व दुसरी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी. दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होईल. • सोयाबीन पिकाची अवास्तव कायिक वाढ रोखण्यासाठी वाढ रोधक संजीवक क्लोरोमीक्वाट क्लोराइड 1000 पीपीएम पेरणी नंतर 40 दिवसांनी फवारावी. • सोयाबीन + तूर या आंतरपीक पद्धतीत पिकांची अवास्तव कायिक वाढ रोखण्यासाठी पीक फुल कळीच्या अवस्थेत असतांना 1000 पीपीएम सायकोसिल या वाढरोधक संजीवकाची फवारणी करावी. |
| पेरणीपूर्व तणनाशक | फ्लुक्लोरॅलीन (बासालीन ४५%) १ किलो क्रि.घ./हे (२ लि./हे.) तणनाशक ६००- ७०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळून द्यावे. |
| उगवणपूर्व | पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकूर पृष्ठभागावर येण्याआधी मेटाक्लोर (ड्युल ५० %) १ किलो क्रि.घ./हे (२ लि./हे) किंवा डायक्लोसुल्याम ८४% डब्ल्यु डीजी (स्ट्राँग आर्म) २२ ते २६ ग्रॅम प्रति हेक्टर ४००- ५०० लिटर पाण्यात वापरावे. |
| उगवण पश्चात तणनाशक | अरूंद पानाच्या तण नियंत्रणासाठी क्विझंलोफॉप पी इथिल ५% ईसी (टरगा सुपर) १ लिटर प्रति हेक्टर किंवा प्रोपाक्झीझेंफोप १०% ईसी (एजिल किंवा सोसायटी) ५०० ते ७०० मि.ली. प्रति हेक्टर वापरावे. रूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी इमॅजिथायपर १०% एस एल (परस्युट) १ लिटर प्रति हेक्टर वापरावे. रूंद व अरूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी इमाझेंमोक्स ३५% इमॅझिथापिर ३५% डब्ल्युजी (ओडीसी) १०० ग्रॅम प्रति हेक्टर वापरावे. पाण्याचे प्रमाण ४०० ते ५०० लिटर प्रति हेक्टर वापरावे. |
| अ.क्र. | तणनाशकाचे सामान्य नाव | व्यापारी नाव | व्यापारी मात्रा (किलो/हेक्टर) | केव्हा व कसे वापरावे |
|---|---|---|---|---|
| १ | फल्युक्लाोरॅलीन ४५% | बासालीन | १.७-२.२ | पेरणीपूर्वी. |
| २ | पेंडीमेथैलीन ३०% ई.सी | स्टॉम्प | ३.३ | उगवणपूर्व. |
| ३ | इमझियेंपायर १०% एस. एल | परस्युट | परस्युट ०.०७५-१.० | उगवणपूर्व किंवा सोयाबिन सलग पिकात उगवण पश्चात पीक १५ ते २० दिवसाचे असतांना, द्रावणात अमोनियम सल्फेट व प्रसारक द्रव्य मात्रेत व योग्य प्रमाणे मिसळून फवारावे. |
| ४ | क्लोरीम्युरॉन ईथाईल २५% ई.सी डब्लयु पी. | क्लोबेन | ०.०४ | उगवणपश्चात पीक १०-२० दिवसाचे असतांना प्रसारक द्रव्य मिसळून घ्यावे. |
| ५ | इमॅझिथापिर + इमाजामॉक्स | ओडिशी | ०.१०० | उगवणपश्चात पीक १५ ते २० दिवसाचे असतांना किंवा तण २-३ पानांच्या अवस्थेत असतील तेव्हा फवारणी करावी. द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मि.ली./लि. पाण्यात +२. ० ग्रॅ. अमोनियम सल्फेट द्यावे. |
| ६ | क्विॉलोफॉप ईथाईल १०% ई.सी | टरगा सुपर | १.० | पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विशेषतः ७गवतवर्गीय त८णांसाठी वापरावे (प्रसारक द्रव्ये १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य वापरावे) |
| ७ | डायक्लोसुलम ८४% ई.सी डब्ल्यु.डी.जी | स्ट्रॅन्ग आर्म | ०.०२६-०.०३० | पेरणीनंतर उगवणपूर्व |
| ८ | फेनॉक्सीप्राप पी ईथाईल १०% डब्ल्यु/डब्लयु ई.सी | व्हीप सुपर | ०.८- १.० | उगवणपश्चात, पीक १५ ते २० दिवसाचे असतांना, गवतवर्गीय तणांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. |
| ९ | फ्ल्युझीफॉप-पी-ब्युटील १३.५% ई.सी | फ्युजीलीड | १.०-२.० | उगवणपश्चात, पीक १५ ते २० दिवसानंतर |
| १० | पेंडीमिथैलीन ३८.७% ई.सी | स्टॉम्प एक्स्ट्रा | ०.७५ -१० १.७५ १.५ |
उगवणपूर्व |
| पीक फुलोऱ्यावर व शेंगात दाणे भरत असलेल्या अवस्थेत असतांना पावसात खंड पडल्यास दोन संरक्षीत ओलीत द्यावे. | ||
| पिकाच्या वाढीची अवस्था | पिकाच्या पेरणी पासुन दिवस | पिकाच्या पेरणीपासुन लागणारे दिवस |
|---|---|---|
| पेरणी | ० दिवस | ० दिवस ७५ ते १०० मि.मी एवढा पाऊस पडल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी. |
| उगवण | ०-५ दिवस | |
| अंकुरण | ५ - १० दिवस | |
| रोपावस्था | १० - १२ दिवस | ३० मि.मी ते ४५ मि.मी. |
| कायिक वाढीची अवस्था | २० - ३८ दिवस | ४५ मि.मी ते ६० मि.मी |
| फुलोर अवस्था | ५० - ६५ दिवस | २२५ मि.मी ते २७५मि.मी. |
| शेंगा अवस्था | ६५ - ८० दिवस | १९५ मि.मी ते २००मि.मी. |
| परिपक्वता अवस्था | ८० - १०० दिवस | ६० मि.मी ते ७०मि.मी |
| एकुण लागणारे पाणी | ६३० ते ७५० मि.ली. | |
| • पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट होतो, तेव्हा पीक कापणीस आले आहे असे समजावे. कापणीचे वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५-१७ टक्के असावे. • कापणीनंतर पीक ताबडतोब खळ्यावर ठेवावे, जेणे करून पावसापासून पिकाचे संरक्षण होईल व बियाण्याची प्रत खराब होणार नाही. |
| • सोयाबीनची मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असावे आणि मळणी यंत्राच्या डुमची गती ३५०-४०० फेरे प्रति मिनिट (आर.पी.एम) या दरम्यान असावी जेणेकरून बियाण्याला इजा पोहोचणार नाही आणि उगवणशक्तिवर विपरीत परिणाम होणार नाही. |
| • साठवणूक करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्केपेक्षा जास्त नसावे. यासाठी बियाणे उन्हात वाळवून तागाचे पोत्यात भरावे. • पोते रचताना पोत्यावर जास्त भार पडणार नाही अशा रीतीने पोते रचावे. • साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी असावी. किड्यांचा / उंदरांचा उपद्रव टाळण्याकरीता विशेष काळजी घ्यावी जेणे करून बियाण्याची प्रत व उगवणशक्ती उत्तम ठेवणे शक्य होईल. लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. • जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी करावी |
|
| • कोरडवाहू स्थितीत प्रति हेक्टरी 15 ते 25 क्विंटल पर्यत उत्पादन मिळते. • सर्वसाधारणपणे सुधारीत लागवड तंत्राचा वापर केल्यास वाणाचे २० ते ३० क्विं/हे. उत्पादन मिळू शकते. |
| मशागतीय नैसर्गिक किडनियंत्रण:- उन्हाळ्यात जमिनिची खोलवर मशागत नांगरट केल्यास किडींच्या विविध अवस्था उन्हात उघड्या पडून मरून जातात. ज्यावेळी आपण दिवसा नांगरट करत असतो त्यावेळी भरपूर चिमण्या, कावळे, बगळे इत्यादी पक्षी कीटक वेचून खातात त्यामूळे 10 ते 15 टक्के किड नियंत्रण या पद्धतीतून मिळते. यामध्ये हुमणी किड, तंबाखूवरील पाने खाणारी अळी व इतर अळ्या यांचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळते. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा करणे – किडीच्या अळ्या, पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक हेपक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य असते. शेतात ठराविक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परिणामकारकरीत्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो. प्रकाश सापळा वापरणे – रात्रीच्या वेळी शेतात २०० वॅटचा दिवा लावून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारे कीटक मरतात. मेलेल्या कीटकांमध्ये हानीकारक कीटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादुर्भावाचे भाकित करता येते व वेळीच उपाययोजना करता येते. कामगंध सापळा वापरणे- सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकित करण्यासाठी देखील होतो. कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर- कीड व रोगप्रतिकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वांत परिणामकारक उपाय आहे. परंतु जास्त उत्पादन देणा-या जाती आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यात. परोपजीवी कीटक – यामध्ये परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी टड्डायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बॅसिलस थुरीजिएन्सीस व बॅव्हेरीआ बॅसिआना हि जैविक किटक नाशके वापरावी. |
||
| कीटक | लक्षणे | नियंत्रण/उपाय |
| खोड पोखरणाऱ्या किडी : खोडमाशी | • या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेत झाल्यास त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परीणाम होऊन पिकाची पुनःपेरणी किंवा उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता असते. • प्रौढ माशा लहान, चमकदार काळ्या असून त्यांची लांबी २ मि.मी. असते. अंडघातून निघालेली व पाय नसलेली २-४ मि.मी. लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरते आणि पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरून खाते. • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. • मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडावर खोडमाशीचे अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशी अळी तसेच कोष फाद्यांत, खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. • शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के पर्यंत घट येते. |
थायमिथोक्झाम ३० एफ एस १० मि.ली. प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसेच केंद्रीय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे क्लोरेंनट्रानिप्रोल १८.५ एस.सी. २ मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के ई.सी. १५ मि.ली. किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के लॅम्बडा सायहेलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ६.६ मि.ली. किंवा क्लोरेंनट्रानिप्रोल ९.३० टक्के लॅम्बडा सायहेलोथ्रिन ४.६० टक्के ४ मि.ली. किंवा बीटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के ईमिडाक्लोप्रिड १९.८१ टक्के, ७ मि.ली किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रिन ४.९ सी एस ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| चक्रभुंगा | • मादी भुंगा, पानाचे देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. यामध्ये मादी तीन छिद्र करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. त्यामुळे चक्राचे वरचा भाग वाळतो. • अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. अळी १९ ते २२ मि.मी. लांब, दंडगोलाकृती, गुळगुळीत, पिवळसर रंगाची असून शरीरावर लहान-लहान उभट भाग दिसतात. • या किडीचा प्रादुर्भाव पीक दीड ते दोन महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडांसारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. • चक्रभुंग्याचे प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाणात, दाण्याचे संख्येत तसेच वजनात अनुक्रमे ५३, ५६ आणि ६६ टक्केपर्यंत घट येऊ शकते. • पूर्ण वाढलेली अळी पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबीनवर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. |
किडीची आर्थिक नुकसानीची पातळी सोयाबीन पिकात फुलोऱ्यापूर्वी ३-५ चक्रभुंगा प्रति मिटर ओळीत आढळल्याबरोबर केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा थायक्लोप्रीड २१.७ ए.सी. १५ मि.ली. किंवा इथिऑन ५० इ.सी. १५-३० मि.ली. किंवा क्लोरट्रेनिलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मि.ली. किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट १.९० ई.सी. ९ मि.ली. किंवा बीटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के ईमिडाक्लोप्रिड १९.८१ टक्के, ७ मि.ली किंवा क्लोरॅनट्रानिप्रोल ९.३० टक्के लॅम्बडा सायहेलोथ्रिन ४.६ टक्के ४ मि.ली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ एस.सी. ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| हिरवी उंटअळी | • अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाक करते. यामुळे ही कीड सहज ओळखता येते. • अंड्यातून निघालेल्या उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात तर मोठ्या अळ्या पानाचा सर्व भाग खातात. • जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि अळ्या फुलांचे व शेंगाचे नुकसान करतात. |
पिकाचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी ४ लहान अळ्या प्रति मिटर ओळीत आढळल्यास केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा क्लोरट्रेनिलीप्रोल १८.५ इ.सी. ३ मि.ली. किंवा इन्डोक्सीकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.ली. किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.ली. किंवा फ्लुबेनडायअमाईड ३९.३५ टक्के एम/एम एस सी ३ मि.ली. फल्युबेंडामाईट २० डब्ल्यु.जी. ५-६ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट १.९ ई.सी. ८.५ मि.ली. किंवा नोव्हॅल्युरीन ६.२५ टक्के + इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एस.सी. १७.५ मि.ली. किंवा क्लोरेंनट्रानिप्रोल ९.३० टक्के + लॅम्बडा सायहेलोथ्रिन ४.६० टक्के ४ मि.ली. किंवा बीटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के + ईमिडाक्लोप्रिड १९.८१ टक्के, ७ मि.ली किंवा ब्रोफानिलीडे ३०० ग्रॅम एस.सी. १.५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.९ सी.एस. ६ मि.ली. किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ एस.सी. ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| तंबाखुची पाने खाणारी अळी | • बहुजातीय पिकांचे नुकसान करणाऱ्या या किडीचा ऑगस्ट महिन्यात सोयाबीनच्या पिकावर मुख्यत्वे प्रादुर्भाव आढळतो. • तंबाखूची अळी मळकट हिरव्या रंगाची असून तिच्या शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. • पूर्ण वाढलेली अळी ३०-४० मि.मी. लांब असते. मादी पतंग पुंजक्याने पानावर अंडी घालतो. • अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानाचा हिरवा पदार्थ खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात आणि या किडीचा प्रादुर्भाव दूर अंतरावरुन सहज ओळखता येतो. • किडग्रस्त जाळीदार पानाचे मागे पुष्कळ लहान अळ्या असतात. तृतीय अवस्थेपासून अळ्या अलग अलग होऊन सोयाबीनची पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पाने राहत नाहीत. |
या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलावर येण्यापूर्वी ३-४ लहान अळ्या प्रती मिटर ओळीत आढळल्यास केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत इन्डोक्सीकार्ब १५.८ एस.सी. ६.६ मि.ली. किंवा स्पायनेटोरम ११.७ एस.सी. ९ मि.ली. किंवा फल्युबेंडामाईट २० डब्ल्यु.जी. ५-६ ग्रॅम किंवा फल्युबॅडमाईट ३९.३५ एस.सी. ३ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट १.९ ई.सी. ८.५ मि.ली. किंवा नोव्हॅल्युरीन ६.२५ टक्के+ इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एस.सी. १७.५ मि.ली. किंवा ब्रोफानिलीडे ३०० ग्रॅम एस.सी. १.५ मि.ली. किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ एस.सी. ६ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| केसाळ अळी | • पूर्ण वाढलेली अळी ४० ते ४५ मि.मी. लांब असून तिची दोन्ही टोके काळी तर मधला भाग मळकट पिवळा असतो. • तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूवर राहून त्यातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. • अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरतात व पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भावात त्या झाडाचे खोडच शिल्लक ठेवतात आणि दुसऱ्या शेताकडे प्रयाण करतात. • या अळीचा पतंग पुंजक्यात अंडी घालतो आणि त्यातून निघालेल्या असंख्य अळ्या द्वितीय अवस्थेपर्यंत त्याच पानावर राहतात व पानातील हिरवा भाग खातात. • म्हणून अंडीपुंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील असंख्य अळ्यांसह गोळा करुन केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. • पिकाचे लहान अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा पिकावर विपरीत परीणाम होतो. |
या किडीचे नियंत्रणासाठी मिथील पॅराथिआन 2 टक्के भुकटीची 20 किलो प्रति हेक्टरी प्रमाणे धुरळणी करावी. किवा पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. |
| पाने पोखरणारी अळी | • पूर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मी. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो. • अळी फिकट हिरव्या रंगाची, गर्द डोक्याची असून सुरुवातीस सोयाबीनची पाने पोखरते, त्यामुळे किडग्रस्त पान आक्रसते. • पुढे अळी पानाची गुंडाळी करुनच पानाचा हिरवा भाग खाते. • पानाचे गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो. • प्रादुर्भाव जास्त झाल्यास पूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते. |
पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. किवा ट्रायाझोफोस ४० इसी १२.५ एम.एल. १० लिटर पाण्यामध्ये. |
| रस शोषण करणाऱ्या किडी १) पांढरी माशी | • रस शोषण करणाऱ्या गटातील ही महत्वाची कीड आहे. • प्रौढ माशी १- २ मि.मी. आकाराची, फिक्कट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणचट पातळ थर असतो. • पांढऱ्या माशीचे प्रौढ आणि पिल्ले पानाचे मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. • प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर टाकते. • त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याचे प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयाबीनचे मोझेक रोगाचा प्रसार करते. • त्यामुळे पाने पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. |
प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रीस आणि चिकट तेलाने लेपित पिवळे चिकट सापळे वापरा. तीव्र प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी ऍसिटामिप्रिड २० एसपी (@४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात किंवा ट्रायझोफॉस@२.५ मिली/लिटर किंवा मिथिल डायमेथोएट ३०% @१० मिली / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांनी फवारणी पुन्हा करा. |
| रोग आणि त्यांचे नियंत्रण | ||
| लक्षणे व परिणाम | नियंत्रणाचे उपाय | |
| पानावरील जिवाणूचे ठिपके | • झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. • ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्याचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात. • आर्द्र हवामानात रोग झपाट्याने वाढतो. |
कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन १ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| पानावरील बुरशीजन्य ठिपके | • झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. • कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात. • आर्द्र हवामान रोग प्रसारास अनुकूल ठरते. |
१) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास (कार्बोक्सीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के) मिश्र घटक ७५ टक्के डी.एस. ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. २) केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत पाय्राक्लोस्त्रोबीन २० टक्के डब्ल्यु.जी. १० ग्रॅम किंवा टेबुकोनाझोल १० डब्ल्यु.पी. + सल्फर ६५ टक्के डब्ल्यु.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. |
| तांबेरा | • रोगाची लागण झाल्यास पानाच्या मागील भागावर तांबडे किंवा फिक्कट काळपट, लोखंडी गंजाच्या रंगाचे, सुईच्या टोकाच्या आकाराचे डाग पडतात. रोगाचा जास्त प्रकोप झाल्यास पाने गळून पडतात • शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात आणि उत्पादनात लक्षणीय घट येते. |
१) प्रतिबंधक जातींचा पेरणीकरीता अवलंब करावा. २) प्रोपीकोनाझोल २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी |
| शेंगेवरील करपा | • पाने, खोड आणि शेंगावर अनियमीत आकाराचे भुरकट ठिपके पडतात आणि त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशी फळे दिसून येतात. • बी तयार होण्याच्या प्रक्रियेत विपरीत परीणाम होतो. पाने, खोड व शेंगामध्ये बुरशी सुप्तावस्थेत राहते. |
१) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (मिश्र घटक) ७५ टक्के डी.एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारसीत टेबुकोनाझोल २५.९ टक्के १२.५ मि.ली. किंवा टेबुकोनाझोल १० टक्के डब्ल्यु जी + सल्फर ६५ टक्के डब्ल्यु जी २० ग्रॅम किंवा पायऱ्याक्लोस्ट्रोबीन २० टक्के १० ग्रॅम किंवा पायऱ्याक्लोस्ट्रोबीन + इपोक्झीकोण्याझोल १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. |
| मूळ आणि खोडसड | • रोपावस्थेत रोगाची लागण जास्त दिसून येते. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. • खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्न पुरवठा होत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. • अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात. • रोगट खोडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशीबीजे (स्क्लेरोशिया) दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस रोगाच्या प्रसाराला पोषक ठरते. |
१) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के (मिश्र घटक) ७५ टक्के डी.एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) जमिनीत निंबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत. |
| कॉलर रॉट | • झाडाचे मूळ व खोड यांच्या खोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशी बीजे ही आढळून येतात. • पुढे झाडाच्या या भागाची सड होते. झाड सुकते व मरून जाते. पण मोठ्या अवस्थेत झाड पिवळे पडते व नंतर मरते. |
१) पेरणीपूर्वी कार्बोक्सीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (मिश्र घटक) ७५ टक्के डी.एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. २) शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा तसेच लागण झालेली झाडे उपटून काढावी व शेताबाहेर नेऊन जाळावीत. |
| मोझेक | • रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात व त्याही खुरटलेल्याच सापडतात. • रोगप्रसार मावा किडीव्दारे व बियाण्यापासून होतो. |
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एसीफेट ७५ एसपी @ ५ ग्रॅम/लिटर किंवा मिथाइल डेमेटॉन २५ईसी@२ मिली/लिटर किवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| पिवळा मोझेक | • रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. • शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पांढऱ्या माशीव्दारे रोगप्रसार होतो. |
केंद्रीय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसीत किटकनाशक नसल्यामुळे प्रतिबंध म्हणून पिवळ्या चिकट सापळ्यांचा साधारणपणे ६४ प्रति एकर प्रमाणे १५ बाय ३० सें.मी. आकाराचे फोम शीट किंवा टीन पत्रा किंवा पॉलिथीन शिट पासून बनविलेले किंवा रेडीमेड सापळे उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावेत व उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपमर, मुळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्म जिवाणूचा करपा इत्यादी रोग तसेच खोडमाशी, चंक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व किटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्यांचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे व किडींचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रोग व किडी याकरिता एकीकृत व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. • सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी. त्यामुळे बुरशीची बीजे, तंतू तसेच बुरशीची फळे या रोगांचा आणि किडीचे अवस्थांचा, पक्षांव्दारे तसेच उष्णतेमुळे आणि जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो. • सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी. • विषाणूमुक्त निरोगी बियाणे वापरावे. • पेरणीसाठी कीड व रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची पेरणी करीता निवड करावी. • पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. • पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे. • बांधावर असणाऱ्या किडींच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा. • शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी. • चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, म्हणून किडग्रस्त झाडे, वाळलेल्या फांद्या,पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा. • केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानांसह नायनाट करावा. • सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताच कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत. तसेच आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी. • पाने खाणाऱ्या किडींचे व्यवस्थापनाकरिता ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा. • सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये. • पिकाची फेरपालट करावी. |
| • वेळेवर (१५ जुलैपर्यंत) पेरणी करावी. मात्र धुळ पेरणी करु नये. • जमिनीच्या प्रकारानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. पिडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया, पिडीकेव्ही यलो गोल्ड, एम.ए.यु.एस-१५८, एम.ए.यु.एम. १६२, एमएयुएस-६१२ • अनुवंशिक शुध्दता असाणारे तसेच जोमदार व चांगल्या प्रतिचे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. ४) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती अवश्य तपासून घ्यावी. • पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची व किटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतरच जिवाणूसंवर्धन लावावे. • बियाणे ४ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये. • उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. पेरणी पट्टा पध्दतीने करावी. • पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी प्रत्येकी ३ ओळीनंतर १ सरी काढावी. • आवश्यकतेनुसार बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे. यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि दर्जेदार बियाणे हमखास मिळते. • ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल व जमीन चोपण असेल अशा जमिनीत जिप्सम २० बॅग (१० किंटल) प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीचे वेळी मिसळून द्यावे. • चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ०.५ टक्के (५० ग्रॅम) + ०.२५ टक्के (२५ ग्रॅम) कळीचा चुना, १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणाची फवारणी दोन वेळा (पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमधे) करावी. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही (पाने पिवळी पडणे) व योग्य उत्पादन मिळेल. • पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. • कापणी अगदी अचूक वेळेवर करून जास्त काळ ढीग लावून न ठेवता मळणी करावी. • मळणी करताना ड्रमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसावी. |
| • सोयाबीन पिकाच्या पाण्याच्या ताणाच्या अवस्थेत पीक फुलोर अवस्थेनंतर १५ दिवसांनी प्रति हेक्टरी ५ टन कुटार आच्छादना सोबतच पोटॅशियम नायट्रेट १ टक्का किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट ५ टक्के किंवा ग्ल्यीसिरोल ५ टक्के फवारण्याची शिफारस करण्यात येत आहे. (अ.भा.स.सो.सं.प्र. २०१४-१५) • सोयाबीन पिकाची अवास्तव कायीक वाढ रोखण्यासाठी तसेच अधिक मिळकतीसाठी वाढ रोधक संजिवके क्लोरोमिक्वाट क्लोराईड @ १००० पीपीएम (२ मि.ली. प्रति लिटर प्रमाणे) पाण्यात मिसळून पेरणीनंतर ४० दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. • सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन व आर्थिक मिळकतीसाठी शिफारशीत खतांची मात्रा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी किंवा २ टक्के १९:१९:१९ (नत्र, स्फुरद व पालाश) ची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. |



