S
H
A
S
H
V
A
T
Whats-app.png

तूर पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

तूर पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

Picture16.jpg
जगात कडधान्याचे सर्वात जास्त उत्पादन, वापर आणि आयात भारतातच होते. कडधान्यामध्ये तूर हे पिक सर्वात महत्वाचे असुन भारतीयांच्या आहारात तूरडाळीस फार महत्व आहे. या पिकाच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणु हवेतील नत्र शोषुन घेते त्यामुळे या पिकाची नत्राची गरज ब-याचशा प्रमाणात परस्पर भागविली जाते. तूर पिकापासुन जास्तीत-जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर प्रामुख्याने योग्य जमिनीची निवड, अधिक उत्पादन देण्या-या वाणांचा वापर, रोपांची योग्य हेक्टरी संख्या, रासायनिक खतांचा संतुलित वापर, आंतरमशागत, पिकसंरक्षणाचे नियोजन, योग्य वेळी पेरणी या बाबी महत्वाच्या आहेत.
सध्या विदर्भात लागवडीखालील बहुतेक जाती मध्यम ते उशिरा कालावधीच्या आहेत. महाराष्ट्र राज्यात सुमारे ९० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र या वाणांखाली येते. मागील काही वर्षाच्या संशोधनाव्दारे हळव्या तसेच गरव्या सुधारित वाणांचा विकास झाला आहे. लागवडीकरिता तुरीच्या हळव्या किंवा गरव्या वाणांची निवड करताना प्रामुख्याने जमिनीची प्रत (पोत), पर्जन्यमान, पीक पध्दती (आंतर, सलग, दुबार) या यार्वीचा विचार करता सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल.
तुरीचे पिक मध्यम ते भारी जमीनीत (४५ ते ६० सेमी) खोल,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ क्षारयुक्त जमीनीत तूर पिक चांगले येत नाही तसेच आम्लयुक्त जमीनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या ग्रंथीची वाढ योग्य होत नसल्याने रोपे पिवळी पडून उत्पादनात घट येते. जमीनीचा सामु हा ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान तूर पिकास २१ ते २५ से.ग्रे. तापमान चांगले मानवते. वार्षिक सरासरी ७५० ते १००० मि.मि. पर्जन्यमान पडणा-या विभागात हे पिक चांगले येते. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान या पिकास अधिक उपयुक्त असते. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा या पिकास आवश्यक असते.
तूर या पिकाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे पहिली नांगरटी २५ ते ३० सें.मी. खोल नांगरणी करणे आवश्यक असते. वखरांच्या पाळ्यानी जमिन भुसभुसीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी ०५ टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत-शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
या पिकाची पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जुनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहीला आठवडा या दरम्यान पेरणी पुर्ण करावी. बियाणे प्रमाण आणि पेरणी अंतर : पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे अत्यंत महत्वाचे असते.
वाण परिपक्व होण्याचा कालावधी लागवड अंतर दोन ओळीतील अंतर (सेमी) x दोन झाडांतील अंतर बियाणे दर किलो/हेक्टरी हेक्टरी उत्पादन वैशिष्टे
आयसीपीएल ८७ १२५-१३५ ४० x २० ४०-४५ ९-१० दाणे टपोर, पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुसरा बहार घेता येतो. दुबार पिकास योग्य.
एकेटी ८८११ १३०-१४० ६० x २० १५-२० १०-११ अधिक उत्पादन देणारा, लवकर तयार होणारा.
पीकेव्ही तारा १७८-१८० ९० x ३० १२-१५ १९-२० अधिक उत्पादन देणारा, मर रोगास प्रतिबंधक व वांझ रोगास साधारण प्रतिकारक्षम, फटका डाळीचे प्रमाण इतर वाणांपेक्षा ५ ते १० टक्के अधिक.
बीएसएमआर ८५३ १७८-१८० ९० x ३० १२-१५ १५-१६ अधिक उत्पादन देणारा, पांढऱ्या दाण्याचा मर व वांझ रोगास प्रतिबंधक
बीएसएमआर ७३६ १८०-१९० ९० x २० १२-१५ १५-१६ अधिक उत्पादन देणारा, हिरव्या शेंगाचा, लाल दाण्याचा, मर व वांझ रोगास प्रतिबंधक.
आयसीपीएल ८७११९ (आशा) १८०-२०० ९० x २० १२-१५ १२-१४ मर व वांझ रोग प्रतिबंधक, भारी जमिनीस योग्य.
बीडीएन ७१६ १६५-१७० ६० x २०
९० x ३०
१२-१५ १८-२० मर व वांझ रोगास प्रतिबंधक, हिरव्या शेंगांचा, पर्जन्यावर अवलंबून असणाऱ्या भागात ठराविक वेळेत पेरणीस योग्य
बीडीएन ७०८ १६०-१६५ ६० x २०
९० x ३०
१२-१५ १६-१८ चमकदार लाल रंगाचे दाणे, गर्द लाल शेंगा, मर व वांझ रोगास प्रतिबंधक तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडींना सहनक्षम, कमी पर्जन्यमानाच्या (५५०- ६५० मि.मी.) भागासाठी योग्य.
विपुला ११५०-१७० ६० x २०
९० x ३०
१२-१५ १६ सलग तसेच आंतरपिक पध्दतीसाठी, भरघोस उत्पादन देणारा वाण, मर तसेच वांझ रोगास मध्यम प्रतिकारक.
फुले राजेश्वरी १४०-१५० ६० x २०
९० x ३०
१२-१५ २२ मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम, लवकर पक्वता, तांबड्या रंगाचे टपोरे दाणे.
पिडीकेव्ही आश्लेशा १७४-१७८ ६० x २०
९० x ३०
१२-१५ १९-२० मध्यम कालावधीचा, अधिक उत्पादन देणारा लाल रंगाचा वाण, मर, वांझ, फायटोप्थोरा करपा, मॅक्रोफोमिना करपा, पानांवरील सकोस्पोरा ठिपके या सर्व रोगास मध्यम प्रतिकारक्षम, मध्य भारतात खरीप लागवडीस उपयुक्त.
पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोडावे. त्यानंतर प्रति १० ते १५ किलो बियाणास चवळी गटाचे रायझोबीयम जिवाणुसंवर्धन तूर बियाणासाठी २५० ग्रॅम संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातुन चोळावे नंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणीत वापरावे.
प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा सेंद्रीय खत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. तूरीस खतांची मात्रा २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ३० किलो पालाश व मातीपरीक्षणानुसार कमतरता असलेल्या जमिनीमध्ये २० किलो गंधक प्रति हेक्टरी दयावे.
पिक सुरूवातीपासुनच तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पहिली कोळपणी २० ते २५ दिवसांनी आणि दुसरी कोळपणी ३० ते ३५ दिवसाचे पिक असताना करावी. तूर पिक पहिले ३० ते ४५ दिवस तण विरहीत ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
तूर हे पिक बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येते परंतु पावसाळयात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमिन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकुन राहत नाही. जमिनीतील ओलावा खुपच कमी झाल्यास आणि फुले लावल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीत ओलावा फार कमी होण्यापुर्वीच आणि फुले येण्याच्या सुरूवातीलाच संरक्षित पाणी दयावे. अवर्षण प्रवण भागात लवकर येणा-या तूरीच्या पिकास पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पिक फुलो-यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचुन राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पारंपारीक शेतीमध्ये कोरडवाडु क्षेत्रात तूर हे मिश्र किंवा आंतरपिक म्हणुनच घेतले जाते. कपाशीच्या ६ किंवा ८ ओळीनंतर १ ओळ तूरीची अशी पद्धत विदर्भामध्ये प्रचलित आहे. यासाठी ५ ते ६ महिने कालावधी असलेल्या बि.एस.एम.आर.८५३, बि.एस.एम.आर.- ७३६ विपूला या वाणाची निवड करावी. विदर्भामध्ये खरीप ज्वारी क्षेत्रामध्ये ४५ से. मी. अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी आणि त्यानंतर ३० से. मी. अंतरावर तुरीची एक ओळ अशी पद्धत प्रचलित आहे. भुईमुंग किंवा सोयाबीनच्या तीन ओळीनंतर तूरीची एक ओळ पेरावी आणि दोन ओळीतील अंतर ३० से. मी. ठेवावे. तसेच पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तूर हे पिक धान या मुख्य पिकाच्या बांधावर लागवड केली जाते.
तुरीच्या शेंगा वाळल्यावर पिक कापुन घ्यावे व खळ्यावर काठीच्या सहायाने किंवा पेंढ्या झोडपुन नळणी करावी. साठवणीपुर्वी तूरधान्य ५ ते ६ दिवस चांगले कडक उन्हात वाळवावे. त्यानंतर पोल्यात किंवा कोठीत तूरधान्य साठवावे. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला ५ टक्के धान्यात मिसळून धान्य साठवावे. त्यामुळे धान्य किडीपासुन सुरक्षीत राहते.
कीटक लक्षणे नियंत्रण/उपाय
१. तुरीवरील हेलीकोव्हरपाची अळी शेंगा पोखणारी अळी हेलीकोव्हरपा या नावाने ओळखली जाते. ही एक बहु‌भक्षी कीड आहे. हेलीकोव्हरपाची एक अळी साधारणतः ७-१६ शेंगाचे नुकसान करते. पुर्ण विकसीत अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुध्दा आढळतात) असते. शरिराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. नुकसान : अळी लहान असतांना कळी फुलोऱ्यावर तर मोठी अळी मुख्यतः शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमीत आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खाते. वनस्पतीजन्य किटकनाशके : सुरूवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक किटकनाशके : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता एच.ए.एन.पी.व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x१०० तीव्रता) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अतिनील किरणात टिकविण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात ५० ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण १ मि.ली. प्रती लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. फवारणी शेतात प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या असतांना केल्यास अतिशय प्रभावी ठरते. रासायनिक किटकनाशके : तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठल्यानंतर (१० ते २० अळ्या प्रति १० झाडे) इथिऑन ५० ई.सी. १०-१५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. किंवा फ्लुबेंडामाईड २० डब्ल्यु.जी. ५ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ७ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ४.४ ग्रॅम किंवा क्लोरेंनट्रीनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे शिफारशीत इन्डोक्झाकार्ब १५.८ टक्के (७ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात) वापर करता येईल.
२. तुरीवरील पिसारी पतंग अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली व पाठीवर काटेरी लव असलेली असते. कोष दिसायला अळीप्रमाणे पण तपकिरी रंगाचा असतो. नुकसान : लहान अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते. मोठी अळी तुरीच्या शेंगावरील साल खरडून शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते. अळी शेंगेच्या आत कधीच शिरत नाही. रासायनिक किटकनाशके: पिसारी पतंगाच्या ५ ते १० अळ्या प्रती १० झाडे आढळून आल्यास मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ११ मि.ली. (मोनोक्रोटोफॉस किटकनाशक रेड लेबल गटात येत असल्यामुळे अतिशय गरज भासल्यास काळजीपूर्वक वापरावे) किंवा कार्बारील १० टक्के पाण्यात मिसळणारी पावडर ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
३. तुरीच्या शेंगेवरील माशी अळी पांढऱ्या रंगाची, व गुळगुळीत असते. अळीला पाय नसतात व अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. शेंगाच्या बाह्य निरीक्षणावरून या अळीच्या प्रादुर्भावाचे लक्षण दिसून येत नाही. पुर्ण विकसीत अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला छिद्र पाडते तेंव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. नुकसान : तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करते. शेंगमाशीची एक अळी शेंगेच्या आत राहून एका दाण्यावर उपजिवीका पूर्ण करते. अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खात असल्यामुळे दाण्यांची मुकणी होते. बुरशीग्रस्त दाणे खाण्यासाठी अथवा लागवडीसाठी अयोग्य ठरतात तूरीवरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के ई.सी. २० मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मि.ली., इन्डोक्झाकार्ब १५.८ टक्के ई.सी. ७ मि.ली., लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस. एल. (मोनोक्रोटोफॉस किटकनाशक रेड लेबल गटात येत असल्यामुळे अतिशय गरज भासल्यास काळजीपूर्वक वापरावे) ११ मि.ली. यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूरीवरील रोग व त्याचे व्यवस्थापन :
रोग लक्षणे नियंत्रण/उपाय
(१) मर हा रोग फ्युजारीयम उडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पानाच्या शिरा पिवळ्या होतात व पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधी कधी खोडावर पांढरी बुरशी सुध्दा आढळते. पिकाची दिर्घकालीन फेरपालट अवलंबावी. रोग प्रतिबंधक जाती पेराव्यात. उदा. गोदावरी, बिडीएन ७१६, आयसीपीएल ८७११९ (आशा), बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ व पीकेव्ही तारा, पिडीकेव्ही आश्लेशा इत्यादी. पेरणीपूर्वी मिश्र बुरशीनाशक कार्बोक्सीन ३७.५% + थायरम ३७.५ टक्के ३ ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
(२) वांझ (स्टरीलीटी मोॉक) हा विषाणूजन्य रोग असून झाड झुडपासारखे वाढते व पानांचा रंग फिकट हिरवा दिसतो. पानावर पिवळे गोलाकार ठिपके दिसतात. झाडावर अत्यंत कमी किंवा मुळीच शेंगधारणा होत नाही. या रोगाचा प्रसार ईरीयोफाईड कोळ्यांमुळे होतो. बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, आशा किंवा पीकेव्ही तारा या वाणांची लागवड करावी. मारोती हा वाण या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडतो. कोळीनाशकांद्वारे कोळ्यांचे व्यवस्थापन करावे.
(३) खोडावरील करपा
(अ) कोलेटोट्रायकम करपा हा रोग कोलेटोट्रायकम डिमॅशियम या बुरशीमुळे होतो. खोडावर, फांद्यावर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आढळतात. रोगाची तिव्रता अधिक असल्यास फांद्या व झाडे वाळतात. प्रतिबंधक उपाय म्हणून रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावीत.
(ब) फायटोप्थोरा करपा हा रोग फायटोप्थोरा ड्रेसलेरा या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी वा गर्द तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडा सभोवती खोलगट भाग तयार होतो व काही वेळा खोडावर गाठी तयार होतात. पाण्यातून व हवेव्दारे या रोगाच्या बिजाणूंचा प्रसार होतो. रोगग्रस्त शेतात तसेच पाणी साचणाऱ्या जमिनीत पीक घेऊ नये आणि रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.
१.तुरीच्या सलग पिकासाठी लागवडीच्या बाबी येथे दिल्या आहेत. त्यामध्ये जमिनीचा पोत आणि उत्पादनक्षमता तसेच पेरणीच्या वेळेप्रमाणे ओळीतील अंतर कमी जास्त करावे.
२. पेरणी जुलैमध्ये उशिरा किंवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करावयाची झाल्यास जसजसा पेरणीस उशीर होईल त्याप्रमाणादोन ओळीतील तसेच दोन झाडातील अंतर कमी करावे, कारण उशिरा पेरणी केली असता वाढ कमी होते.
३. लवकर येणारे वाण सलग पेरणीस योग्य ठरतात तर आंतरपीक पध्दतीमध्ये मध्यम किंवा उशिरा येणारे वाण योग्य ठरतात.
४. तुरीची पेरणी जुलैचा पहिला आठवडा किंवा पाऊस असल्यास त्याही अगोदर करावी. अर्थ रबी तुरीची पेरणी १५ सप्टेंबरपर्यंत करावी.
५. तुरीच्या सर्व वाणांसाठी खताची मात्रा २५किलो नत्र + ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश तसेच गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.